आजसुद्धा आपण साम्राज्यवादाच्या युगातच जगतो आहोत आणि आजसुद्धा साम्राज्यवादाद्वारे सामान्य कष्टकरी जनतेवर अनेक युद्धे लादली जात आहेत. म्हणून, साम्राज्यवाद कशा प्रकारे युद्धांना जन्म देतो, हे समजून घेणे आजही गरजेचे आहे. तसे पाहता पहिल्या महायुद्धाबद्दल जवळपास सर्वांनीच वाचलेले आहे, ऐकलेले आहे. परंतु त्याची ऐतिहासिक कारणे काय होती याबाबत अनेक भ्रम दिसून येतात, किंवा अधिक स्पष्ट शब्दांत सांगावयाचे झाले तर, अनेक भ्रम पसरविले गेले आहेत. अनेक भाडोत्री इतिहासकार हे युद्ध काही शासकांच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षा आणि इच्छेमुळे घडले, असेच सांगत असतात. बहुतेक या युद्धाची एकूण ऐतिहासिक पृष्ठभूमी गायब करतात आणि ऑस्ट्रियाचा आर्कड्यूक फ्रांज फर्डिनांडची साराजेवोमध्ये हत्या झाल्यामुळे या युद्धाचा भडका उडाल्याचे सांगतात. शालेय पुस्तकांमध्येसुद्धा अशा प्रकारच्या तात्कालिक कारणांवरच जोर दिला जातो आणि त्याच्या मूळ कारणांकडे डोळेझाक केली जाते. जर ऑस्ट्रियाच्या राजकुमाराची हत्या झाली नसती तर पहिले महायुद्ध झालेच नसते का? हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. कोणताही गंभीर वाचक अशा मूर्ख विश्लेषणावर विश्वास ठेवणार नाही. काही गोष्टी समजून घेण्यासाठी पहिले महायुद्ध समजून घेणे महत्त्वाचे आहे. पहिल्या महायुद्धात पहिल्यांदाच साम्राज्यवादाचे अंतर्विरोध आणि भांडवलशाहीचे नरभक्षक चारित्र्य पूर्णपणे नग्न रूपात अशा प्रकारे जगासमोर आले होते. याच काळात सर्वहारा आंदोलनातील गद्दारांनी आणि घरभेद्यांनी आपापले मुखवटे उतरवले आणि त्यांचा खरा चेहरा दिसून आला. दुसऱ्या इंटरनॅशनलचे तमाम नेते साम्राज्यवादी युद्धाला सर्वहारा क्रांतीची संधी बनविण्याऐवजी 'पितृभूमीच्या रक्षणा'ची घोषणा देत आक्रमक अंधराष्ट्रवादाच्या प्रवाहात सामील झाले. दुसरीकडे, लेनिनच्या नेतृत्त्वाखाली बोल्शेविक पार्टीने युद्धाला क्रांतीच्या संधीत रूपांतरित करण्याच्या क्रांतिकारी घोषणेची अंमलबजावणी केली. या युद्धातून युद्धातून निर्माण झालेल्या परिस्थितीने १९१७ च्या ऑक्टोबर क्रांतीला जन्म दिला व लेनिनवादाचा विजय झाला. हे महायुद्ध साम्राज्यवादाचे तीव्र होणारे अंतर्विरोध टोकाला जाण्याची अभिव्यक्ती होते. दोन्ही महायुद्धांची कारणे समजून घेण्यासाठी साम्राज्यवाद काय आहे व तो अटळपणे युद्धांना कसा जन्म दोतो ते समजून घेणे गरजेचे आहे. साम्राज्यवादाचा एक एक पैलू समजून घेणे येथे आपला उद्देश नाही. परंतु थोडक्यात साम्राज्यवादाचे मूलभूत बिंदू समजून घेण्याचा प्रयत्न आपण करू. भांडवलशाही कोणत्या टप्प्यांमधून प्रवास करीत साम्राज्यवादापर्यंत येऊन पोहोचली ते समजून घेणे गरजेचे आहे. साम्राज्यवादी युद्धाने निर्माण केलेल्या संधीचा ऐतिहासिक लाभ घेऊन रशियामध्ये क्रांती करणाऱ्या लेनिन यांनी साम्राज्यवादाचे सर्व पैलू विस्तारपूर्वक मांडलेले आहेत. त्यांनी साम्राज्यवादाची व्याख्या करताना म्हटले आहे – साम्राज्यवाद भांडवलशाहीची एक विशेष अवस्था आहे. त्याची विशिष्ट प्रकृती तीन रूपांमधून प्रकट होते ; १. साम्राज्यवाद एकाधिकारी भांडवलशाही आहे. २. साम्राज्यवाद ऱ्हासोन्मुख भांडवलशाही आहे. ३. साम्राज्यवाद मरणासन्न भांडवलशाही आहे. लेनिन यांनी साम्राज्यवादाची पाच मूलभूत वैशिष्ट्ये या प्रकारे सांगितली आहेत ; १. उत्पादन आणि भांडवलाच्या एकवटण्याचे परिणाम इतके विकसित होतात की आर्थिक जीवनावर एकाधिकारी संघटनांचे अधिपत्य स्थापन होते. २. बँकिंग भांडवल आणि औद्योगिक भांडवल एकत्र येतात व या वित्तीय भांडवलावर एक वित्तीय अल्पतंत्राचा उदय होतो. ३. मालांच्या निर्यातीहून पूर्णपणे भिन्न अशा भांडवलाच्या निर्यातीला विशेष महत्त्व प्राप्त होते. ४. आंतरराष्ट्रीय एकाधिकार संघ निर्माण होतात. ५. सर्वाधिक शक्तीशाली भांडवली शक्तींमध्ये एकूण जगाचे क्षेत्रीय वाटप पूर्ण होते. ही मूलभूत वैशिष्ट्ये समजून घेऊनच आपण आधुनिक युद्धांची कारणे समजू शकतो. ही वैशिष्ट्ये थोडक्यात समजवण्याचा येथे प्रयत्न केलेला आहे.
No comments:
Post a Comment